ईडीच्या नोटिशीनं घडवलं सत्तांतर..
नाशिक : विधानसभा
निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ईडीनं नोटीस
पाठवली आणि आपण त्याच दिवशी शरद पवार यांची भेट घेऊन आता सत्ताकारण बदललं
पाहिजे असं सांगितलं.. त्यानंतर घडलेल्या घडामोडीनंतर आम्ही एकत्र आलो आणि
आज महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलंय असा खुलासा करतानाच शरद पवार हेच
महाविकास आघाडीचे शिल्पकार असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी
म्हटलंय..
नाशिकमध्ये महाकवी कालिदास मंदिरात खासदार संजय राऊत यांची
मुलाखत पार पडली.. यावेळी संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या
जुळवाजुळवीमागचं गूढ उकललं.. जेव्हा शरद पवार यांना ईडीनं नोटीस दिली;
तेव्हा राज्यभर गदारोळ झाला.. तेव्हाच आपल्या डोक्यात ठिणगी पेटली आणि आपण
शरद पवारांना भेटायला गेलो.. देशात आणि राज्यात सुरु असलेला गदारोळ कुठेतरी
थांबला पाहिजे, त्यासाठी आता हे बदललं पाहिजे असंही त्यांना सांगितलं..
तेव्हाच शरद पवार यांनी आपल्याला आश्वस्त केलं आणि पुढे महाविकास आघाडीचा
जन्म झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय..










