दौंड : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या काळात चांगले काम केलेल्या कर्मचारी, सामाजिक संस्थांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्याचा उत्साह दौंड मध्ये चांगलाच अंगलट आला.. ज्याने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला तोच दुपारी पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या समवेत कार्यक्रमात सहभागी असलेल्या पंचायत समितीच्या सर्वच कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन व्हायची वेळ आली.
कोरोनाची भीती प्रत्येकालाच.. पण जसजसे घरातील भीती घालणारे न्यूज चैनल लोकांनी बंद केले आणि अनलॉकचा कालावधी सुरू झाला तसतशी कोरोना चावून खाल्ल्या सारखीच सर्वांची अवस्था पाहायला मिळतेय. दौंड तालुक्यात तर जणू आपणच कोरोनाची जिरवली आहे अशा स्थितीतच सगळे जण बाहेर पडताहेत आणि त्यातूनच कोरोनाचा उद्रेक तालुक्यात वाढला आहे. अगदी कालपरवाचाच दौंडचा किस्सा मात्र स्मरणात राहणारा असाच झाला.
दौंड मध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. दौंड शहरच नव्हे तर ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. या धामधुमीच्या वातावरणातच दौंडच्या पंचायत समितीमध्ये कोरोना काळात चांगले काम केलेल्यांचा सन्मान करण्यात आला.
हा सन्मान करणे काही चुकीचे नाही, परंतु हा सन्मान करताना सर्वांनी काळजी घेणे आवश्यक होते, मात्र ज्याने सकाळी कोरोनाच्या तपासणीसाठी स्वाब दिला आहे, अशापैकीच एक जण या कार्यक्रमात सहभागी होता. केवळ सहभागीच होता असे नाही, तर त्याने या कार्यक्रमाचे बऱ्यापैकी नियोजनही केले होते. दौंडच्या पंचायत समितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि संध्याकाळी चार वाजता यामधील संबंधित व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. जशी ही व्यक्ती कोरणा पॉझिटिव्ह आहे, अशी माहिती मिळाली, तशी या कार्यक्रमात सहभागी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची भीतीने गाळण उडाली आणि या सर्व कर्मचाऱ्यांवर क्वारंटाईन व्हायची वेळ आली.
आता गंमत अशी की, दौंडच्या पंचायत समितीच्या सभापतींना देखील काही दिवस क्वारंटाईन व्हावे लागले होते, आता पंचायत समितीचा बहुतांश कर्मचारी वर्गच क्वारंटाईन होणार असल्याने पंचायत समिती चालणार कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे.
अर्थात क्वारंटाईन केलेल्या या सर्व कर्मचाऱ्यांना आता मात्र पश्चाताप होतो आहे. कोरोनाचा काळ संपल्यानंतर किंवा कोरोनाचा उद्रेक संपल्यानंतर अशा प्रकारचे कार्यक्रम घेणे अपेक्षित होते, असे आता त्यांना वाटू लागले आहे. मात्र बैल गेला आणि झोपा केला अशा या गडबडीत वेगळाच विचित्र प्रकार दौंडला पाहायला मिळाला.










