दौंड : महान्युज लाईव्ह
कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर तोंडाला मास्कचा वापर न करता विनाकारण फिरणाऱ्या यवत व पाटसला मधील ४३ जणांवर दंडात्मक कारवाईचा बडगा आज यवत पोलीसांनी उगारला आहे. तोंडाला मास्क न घातलेल्या एका व्यक्तींकडून २०० ते ५०० रूपये प्रमाणे दंड आकारून सुमारे ४३ व्यक्तींकडून एकुण १३ हजार ७०० रूपये दंडात्मक कारवाई करून वसुली केली आहे, अशी माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
यवत पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या खुटबाव, केडगाव, बोरीपार्धी,पाटस व वरवंड येथे कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. कोरोना संसर्ग दौंडच्या ग्रामीण भागात वाढत आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग आटोक्या आणण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महसुल विभाग, ग्रामपंचायत प्रशासन जीव धोक्यात घालून प्रयत्न करीत आहे.
दुसरीकडे मात्र काही नागरीकांना सामाजिक भान राहिले नाही. सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्कचा वापर न करता बिनधास्तपणे वावरत आहेत. दुचाकी वरून टिब्बल सीट हार्न वाजवीत विनाकारण फिरत असतात. शासन वारंवार मास्कचा वापर करा, सॅनिटाइजर व साबणाने हात धुवा, विनाकारण घराबाहेर फिरू नका असे जीव तोडून सांगत आहे, तरीही काही महाभाग काय होतय, कोण काय करतय याच भावात फिरत असतात अशा लोकांवर आता यवत पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून चांगलाच दणका दिला आहे.
पाटसमध्ये प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेल्या ठिकाणी विनाकारण फिरणारे व तोंडाला मास्कचा वापर न करणाऱ्या २६ आणि यवतमधील १७ व्यक्तींवर ग्रामपंचायत व पोलीसांनी संयुक्त कारवाई करून दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान, पोलीसांनी केलेल्या या कारवाईचे आरोग्य विभाग व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. ही कारवाई काही दिवस अशीच करावी अशी मागणी होत आहे.










