दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटसमध्ये दोन प्रसिद्ध डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रूग्णालयातील दोन महिला कर्मचारी व एक कंपाऊंडर यास कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. संबंधित डॉक्टर कुटुंबाच्या संपर्कातील रूग्णालयातील कर्मचारी आणि रूग्णाचा शोध घेवून आरोग्य विभागाने दोन दिवसांपूर्वी कोरोना चाचणी केली याचा अहवाल आज प्राप्त झाला. यात रूग्णालयातील कर्मचारी व इतर असे ३५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
आरोग्य विभागाने कोरोना बाधीत डाॅक्टर कुटुंबातील व्यक्तींसह संपर्कातील रूग्ण, रूग्णालयातील कर्मचारी असे सुमारे ५६ जणांची नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ३५ जणांचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत , यामध्ये संबंधित डॉक्टर च्या कुटुंबतील व्यक्ती,रूग्णायातील कर्मचारी,दौंड पंचायत समिती च्या सभापती यांच्या सह सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने पाटसकरांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाने आज संबंधित कोरोनाबाधीत रूग्णालयातील कर्मचारी व कोरोनाबाधीत कर्मचारी यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह इतरांचा शोध घेवून १३ जणांचे कोरोना तपासणीसाठी पाठविले आहेत. आरोग्य विभागाने संबंधित रूग्णालयापासून पाचशे मीटर अंतर सील केले आहे, तसेच संपूर्ण गावठाण, पंचशील नगर, भागवत रायकर वस्ती, ठोंबरे वस्ती, कानगाव रोड, महाराष्ट्र बँक चौकातील भाग प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
वाड्या वस्त्यावरील नागरीकांनी कामाशिवाय गावात येवू नये, बाहेरील व्यक्तींनी गावात प्रवेश करू नये असे आवाहन आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे,तर वरवंड येथील कोरोनाबाधीत व्यक्ती च्या कुटुंबातील व संपर्कातील ८ जणांचे कोरोना टेस्ट करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत..अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.










