बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावामध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल 1317 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे रक्तदान शिबिर आज संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे शेवटपर्यंतच्या एकूण रक्तदात्यांचा संख्या निश्चित झाली नाही. मात्र संध्याकाळी सात वाजेपर्यंत पाच ठिकाणी 1317 हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता.
जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी रक्तदानाचे आवाहन करताना त्याची सुरुवात पोलीस ठाण्यापासून केली आणि जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये सध्या रक्तदान शिबिरे सुरू आहेत. या शिबिरांना नागरिकांचा प्रतिसाद प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळत आहे.
यापूर्वी झिरो पेंडन्सी अंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये शिबिरे भरवण्यात आली होती. त्यामध्ये ही मोठ्या प्रमाणावर जुन्या तक्रारी, वाद मिळवण्यात पोलिसांना यश आले. आता रक्तदान शिबिरे घेऊन पोलीस फक्त कठोर नसतात, तर समाजाच्या हितासाठी सदैव दक्ष असतात असा संदेश पोलिसांनी दिला आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या वतीने वडगाव निंबाळकर, पणदरे, सोमेश्वरनगर, सुपे, मोरगाव या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी केले, तर मोरगाव, सोमेश्वर नगर व सुपे येथील शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले.
वडगाव निंबाळकर येथे संध्याकाळी उशिरापर्यंत रक्तदान सुरू होते. या ठिकाणी 360 रक्तदात्यांनी तोपर्यंत सहभाग घेतला होता. सुपे येथे 257, सोमेश्वरनगर येथे देखील संध्याकाळी उशिरापर्यंत रक्तदान चालू होते. या ठिकाणी 270 बाटल्या रक्त संकलित झाल्या होत्या. पणदरे इथे देखील संध्याकाळी उशिरापर्यंत रक्तदान सुरू होते. या ठिकाणी संध्याकाळी उशिरापर्यंत 260 रक्तदात्यांनी सहभाग घेतला अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान हे रक्तदान शिबिर अजूनही सुरूच होते.