पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाघोली शाखेतील विकास अधिकारी आणि वाडेबोल्हाई येथील विकास संस्थेचा सचिव या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने या घटनेत वाघोली येथील जिल्हा सहकारी बँकेचा विकास अधिकारी दिपक रामचंद्र सायकर आणि वाडेबोल्हाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा सचिव गोपीनाथ दत्तात्रय इंगळे या दोघांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराचे पीक कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी या दोघांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच विकास अधिकारी दीपक सायकर याने स्वीकारली, तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. या दोघांवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस निरीक्षक श्री राम शिंदे हे करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रिलायन्स कंपनीला विमा विकण्यासाठी आपले कार्यालय मोकळे करून दिले होते. सभासदांना वेगवेगळी आमिषे दाखवून जिल्हा बँकेच्या सभासदांना विमा विकला जात होता. यामध्ये पुणे जिल्हा बँकेला मोठे कमिशन मिळत होते. ही घटना ताजी असतानाच आताही लाचखोरीचे प्रकरण बाहेर आले असल्याने, पुणे जिल्हा बँक ही शेतकऱ्यांचे हित नव्हे, तर शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करण्यास मागे पुढे पाहत नाही हेच यातून सिद्ध झाले आहे.