दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंडला कोरोनाचे सत्र काही संपता संपत नाही. आज पुन्हा दौंडमध्ये नव्याने कोरोनाचा एक रुग्ण आढळला, तर एक रुग्ण कोरोनामुक्त झाला.
दौंडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी ही माहिती दिली. काल दौंडमधील एकाची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज आला. यामध्ये हा रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला असून शहरात कालच्या एका रुग्णानंतर लगेचच आज पु्न्हा एक रुग्ण आढळल्याने शहरातील कोरोनाचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत आहे.
दौंडमध्ये काल मृताच्या अंत्यविधीत सहभागी झालेल्या १५० पैकी एकास कोरोनाची लागण झाल्याचे सिध्द झाल्याने दौंडकरांचे धाबे दणाणले होते. आज पुन्हा त्यात एकाची भर पडल्याने ही चिंता कायम राहीली आहे. या साऱ्या प्रकारात आरोग्य खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ वाढली असून पोलिस प्रशासनावरचाही ताण वाढला आहे.










