गिरीममध्ये पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचा छापा,२१ लाखांचा मुद्देमाल जप्त..
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील गिरीम येथे एका शेतकऱ्याने चक्क गांजाचीच शेती केली.. हमीभावाने पिडलेले शेतकरी वाममार्गाने जातील, पण गांजाचं पीक त्याच्या अंगीभूत गुणधर्मानं साऱ्या गावात आपलं अस्तित्व पसरवतं.. साहजिकच शेतकऱ्यानं त्याच्या शेतात गांजाची शेती केल्याची खबर पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली आणि पोलिसांच्या छाप्यात चक्क २१ लाखांचा गांजा सापडला.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार रविराज कोकरे ,अनिल काळे, सचिन गायकवाड, रऊफ इनामदार, गुरूनाथ गायकवाड, सुभाष राऊत, चंद्रकांत जाधव, उमाकांत कुंजीर, महेश गायकवाड, निलेश कदम, काशिनाथ राजापुरे, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.या पथकाने दौंड पोलीसांच्या मदतीने शुक्रवारी रात्री गिरीम हद्दीतील गांजा शेतीवर छापा टाकला. यावेळी या शेतात अवैधरित्या गांजाची झाडे लावलेली आढळून आली. शेतात गांजाची १७३ झाडे व विक्री करण्यासाठी ठेवलेला सुकलेला दोन पोती गांजा असा एकुण १४० किलो १०० ग्रॅम वजनाचा २१ लाख १हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दत्तु शंकर शिंदे ( वय ४७ रा, गिरीम, शिंदे वस्ती ता. दौंड जिल्हा. पुणे) यास अवैध गांजा शेती केल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.










