कोऱ्हाळे येथील कोरोनाबाधिताच्या नातसून व नातीला कोरोना
बारामती : महान्युज लाईव्ह
तालुक्यातील कोऱ्हाळे येथे आज नव्याने दोन रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने कोऱ्हाळे बुद्रुक येथील कोरोना बाधितांची संख्या पाच वर पोहोचली आहे, तर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 22 वर पोचली आहे.
तालुक्यातील कोऱ्हाळे येथे 90 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या 75 वर्षे पत्नीलाही कोरोनाची लागण दोन दिवसापूर्वी झाली. दरम्यान या ज्येष्ठ नागरिकाच्या 24 वर्षीय नातसून व 22 वर्षीय नातीला त्रास होऊ लागल्याने त्यांना पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र पुन्हा उपचारासाठी बारामतीत आल्यानंतर त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले, त्यांचा आज रात्री कोरोना पॉझिटिव्ह असा अहवाल आला आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली. दरम्यान कोऱ्हाळे मध्ये संपूर्ण कुटुंबच कोरोना बाधित आढळल्याने आता कोऱ्हाळेकरांसह तालुक्याची चिंता वाढली आहे.










