कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील ही दुसरी घटना
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पडवी येथे सोमवारी किरकोळ वादातून धारधार चाकूने वार करून एका व्यक्तीचा खून करण्यात आला.
यासंदर्भात यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी माहिती दिली. सोमवारी (ता.१ ) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पडवी येथील गायकवाड मळा येथे ही घटना घडली. या घटनेनंतर खंडू उर्फ रमेश विष्णू गायकवाड याला पोलिसांनी तात्काळ अटक केली.
किरकोळ कारणावरून खंडू गायकवाड याने पोपट वसंत गायकवाड यांना शिवीगाळ व दमदाटी करून धारदार चाकूने छातीत वार केले. या हल्ल्याने पोपट गायकवाड हे गंभीर जखमी झाले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान या प्रकरणी सुर्यकांत लक्ष्मण गायकवाड (वय २६ वर्षे, रा. गायकवाड मळा पडवी ता. दौंड) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून खंडू उर्फ रमेश गायकवाड यास लगेच ताब्यात घेतले. या घटनेचा तपास फौजदार रामभाऊ घाडगे करीत आहेत.
दौंड तालुक्यातील कोरोनाच्या आपत्तीच्या काळातील ही दुसरी घटना आहे, या घटनेची माहिती मिळताच दौंडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.










