कोविड १९ च्या नमुना चाचणी तपासणीस बारामतीत सुरवात
बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत कोरोना नमुने तपासणीस सुरवात झाली असून कोरोनाचे चाचणी अहवाल तत्परतेने मिळण्यास आता मदत होणार आहे. दरम्यान बारामती तालुक्यातील लोणीभापकर व कल्याणीनगर येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कातील ११ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
बारामतीतील रुई रुग्णालयात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनिल दराडे यांनी आज ११ संशयितांसंदर्भात माहिती दिली. संशयितांचे नमुने हे बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेत तपासले आहेत. त्यांचा अहवाल आला असून सर्व ११ संशयितांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. हा तालुक्यातील कोरोनामुक्तीसाठी धडपडणाऱ्या प्रशासनासाठी व स्थानिक नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे. बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे घाटकोपरहून आलेल्या ज्येष्ठ महिलेस कोरोनाची बाधा झाली होती. या महिलेच्या संपर्कातील पाचजणांचा अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आला होता. मात्र बारामतीत उपचारादरम्यान संपर्कात आलेल्या काहीजणांसह २६ मे रोजी कल्याणीनगर येथे आढळलेल्या कोरोनाग्रस्त तरुणाच्या संपर्कातील इतरांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती.











