विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
उरुळी कांचन : उरुळी कांचन ( ता हवेली ) येथील प्रसिध्द गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे यांचा व्यावसायिक वैमन्यस्यातून खू-न करणाऱ्या संशयित ९ आरोपींना न्यायालयिन कोठडी तर एकास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दिले. तलवारीने वार करणाऱ्या अल्पवयीन मुलास बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
बाळासाहेब जयवंत खेडेकर ( वय ५६ ), निखिल बाळासाहेब खेडेकर ( वय २४, दोघे रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन, ता हेवेली ), अक्षय अविनाश दाभाडे ( वय २७, रा.सोरतापवाडी, ता हवेली ), गणेश मधुकर माने ( वय २०, दोघे रा. कोरेगावमूळ ता हवेली ), करण विजय खडसे ( वय २१, रा. माकड वस्ती सहजपुर ता दौंड ), प्रथमेश राजेंद्र कोलते ( वय २३, रा उरुळी कांचन, ता. हवेली ), निखिल मंगेश चौधरी ( वय २० ), सौरभ कैलास चौधरी ( वय २१, रा खेडेकर मळा ता हवेली ) आणि काजल चंद्रकांत कोकणे ( वय १९, रा. बिबवेवाडी, पुणे ) या ९ जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आरोपी निलेश मधुकर आरते ( वय २३, रा. तुकाईदर्शन, हडपसर, पुणे ) याला मात्र पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर १७ वर्षे ३ महिने वयाच्या अल्पवयीन मुलास बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ( ता हवेली ) येथील प्रसिध्द गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे यांच्यावर रविवार ( १८ जुलै ) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलाने तलवारीने वार करून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात आखाडे यांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या खुनाच्या गुन्ह्यातील ११ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी निलेश मधुकर आरते ( वय २३, रा. तुकाईदर्शन, हडपसर, पुणे ) हा सराईत गुन्हेगार असून पुणे शहर व जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन तलवारी व आणखी तीन तलवारी त्याच्या घरातून मिळाली असल्याचे पोलिसांनी न्यायालयास सांगितले.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी आरते यास शनिवार ( ३१ जुलै ) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे आणि पोलीस हवालदार राजेंद्र पुणेकर करीत आहेत.











