बारामती : अष्टविनायकातील मोरगाव येथे आजपासून माघी यात्रा उत्सव सुरू झाला आहे. या निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना पाच दिवस श्रींच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जाईल. यात्रेसाठी राज्यभरातून लाखो गणेश भक्त मोरगाव येथे दाखल झाले आहेत. वर्षभरातील भाद्रपद व माघ महिन्यात श्री मयुरेश्वराची मोठी यात्रा भरते. आज पहिल्याच दिवशी मोठ्या जल्लोषात यात्रेला प्रारंभ झाला.
बारामती पुणे या प्रमुख जिल्हा मार्गावर हे अष्टविनायकातील आद्य स्थान आहे. माघ शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पंचमी या पाच दिवसांच्या काळात लाखो गणेश भक्त मोरगाव येथे येत असतात. वर्षभरात साजरे होणाऱ्या प्रमुख उत्सवा पैकी या पर्व काळाला महत्त्व प्राप्त आहे. कारण पाच दिवस सर्व जाती-जमातीच्या भक्तांना मुख्य मूर्तीचा स्पर्श करून जलस्नान घालता येते. गेली शेकडो वर्षांची ही धार्मिक परंपरा आहे.
पारंपरिक रिवाजाप्रमाणे चिंचवड येथील महान गाणपत्य श्रीमान मोरया गोसावी यांचा पालखी सोहळा दि.२७ सोमवारी रात्री मोरगाव मुक्कामी येणार आहे. यामुळे पाच दिवस मोरगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उत्सवाच्या निमित्त श्री मयुरेश्वरांना राजेशाही थाटातील माणिक मोती हिरे जडित वस्त्रालंकाराचा पोषाख केला जातो. संपूर्ण उत्सवासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि मोरगाव ग्रामपंचायत वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
माघी यात्रा उत्सवासाठी शनिवारी पहाटे चार वाजता मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार खुले करण्यात आले. यावेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असा भक्तांनी जयघोष केला. दैनंदिन पूजा विधी झाल्यानंतर मुख्य गाभाऱ्यात जाण्यासाठी सर्वांना मार्ग खुला करण्यात आला. पहाटे पाच ते दुपारी 12 वाजेपर्यंत जलस्नान निमित्त गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. तसेच दुपारी मानाचा पोशाख श्रींना परिधान केला जातो.











