अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून बारामतीत मुलांना ६.५० लाखांची भेट
बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील मधुमेहाने ग्रस्त असलेल्या ५० मुलांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून व जहांगिर ट्रस्टच्या वतीने ६.५० लाखांची इन्सुलिन, औषधे, रेफ्रिजरेटर आज भेट देण्यात आली.
कोरोनाच्या काळातही पवार कुटुंबाचे सामाजिक काम सुरूच आहे. याची प्रचिती देणारा हा वेगळा कार्यक्रम आज राष्ट्रवादी भवनमध्ये पार पडला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते मुलांना औषधाचे सेट देण्यात आले. या मुलांना कारगिल या तेल उत्पादक कंपनीने जीवनावश्यक वस्तूंचे किटही भेट दिले. ५० मुलांपैकी एका मुलाकडे रेफ्रिजरेटर नसल्याची माहिती मिळाल्याने त्यास सुप्रिया सुळे यांनी १२ हजार रुपये किंमतीचा रेफ्रीजरेटर ही औषधे ठेवण्यासाठी भेट दिला. होळकर यांच्यासह बारामतीतील बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ मुथा, जहांगिर ट्रस्टच्या डॉ. संध्या गायकवाड व त्यांचे सहकारी मंत्रालय कक्ष अधिकारी अमोल भिसे यांच्या हस्ते ही भेट देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी वकील सेल चे तालुकाध्यक्ष अॅड. रविंद्र माने, तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे आदी उपस्थित होते.










