देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना परिवहन मंत्री अनिल परब यांचा टोला
- मुंबई : महान्यूज लाईव्ह
मुंबईत ऑनलाईन पत्रकार परीषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राने राज्याला २८ हजार कोटींची मदत दिल्याचा दावा केला होता, त्यावर परिवहन मंत्री यांनी फडणवीसांनी दिशाभूल केल्याचा आरोप करीत फडणवीस यांनी सांगितलेला १७५० कोटींचा गहू अद्याप राज्याला मिळालेला नसल्याचा टोला मारला.
आज महाविकास आघाडीच्या वतीने संयुक्त पत्रकार परीषद घेण्यात आली. यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील व शिवसेनेच्या वतीने मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परीषदेत सविस्तर माहिती दिली. परब यांनी फडणवीस यांच्या आरोपाची पोलखोल केली. ते म्हणाले, चीनमध्ये अल्प कालावधीत रुग्णालय उभे राहीले, त्यापेक्षा कमी कालावधीत व त्याहून मोठे रुग्णालय मुंबईत उभारले, मात्र त्याचे काहीही कौतुक नाही. केंद्र सरकारने महाराष्ट्रावर काही कोणतीही मेहरबानी केलेली नाही. केंद्राने १२२ कोटी स्थलांतरीत मजुरांसाठी दिल्याचे फडणवीस म्हणाले. मात्र मजूरच आता इथे नाहीत आणि एफसीआयमधून अद्याप धान्य निघालेले नाही. शिवाय गरीब कल्याण योजनेतून जे गहू, तांदूळ व डाळ दिल्याचे सांगितले जाते, ते संपूर्ण देशासाठी आहे. मात्र त्यातही त्यातील गहू अजून राज्याला मिळालेला नाही. किसान निधी सन्मान योजनेतून वर्षाला ६ हजार रुपयांची शेतकऱ्यांच्या हप्त्याची १७२६ कोटी रुपयांची योजना ही आधीपासूनच आहे. त्यात वेगळे काय आहे? असा सवाल परब यांनी केला. मजूरांच्या रेल्वेसाठी केंद्राने एकही रुपया दिला नाही, ६८ कोटी रुपयांची ६०० रेल्वेची तिकीटांची रक्कम राज्याने भरली. दिव्यांगांना सरकारने ११६ कोटी दिल्याचे सांगितले जाते, मात्र राज्यात सुरू असलेल्या योजनेत केंद्राचा वाटा अवघा २० टक्के असून राज्याने १२१० कोटी रुपये दिले, ते मात्र फडणवीस यांनी सांगितले नाही. मुळात राज्याचे जीएसटीचे परताव्याचे १८ हजार २६९ कोटी रुपये केंद्राकडे आहेत, त्यात पुन्हा एप्रिल-मे चे २ हजार ३६९ कोटी रुपये आहेत, शिवाय केंद्राकडे ४२ हजार कोटी थकले आहेत, त्यापैकी केवळ २४ हजार कोटी मिळाले आहेत. असे शिल्लक राहीलले आमच्या हक्काचेच तेवढे पैसे दिले तरी पुरे आहेत.
भाजप महाराष्ट्राचा नक्की कोण?
या पत्रकार परीषदेत जयंत पाटील यांनी भाजपवर खरपूस टिका केली. ते म्हणाले, भाजपा नक्की महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू आहे? फडणवीस आणि भाजप हे कोरोनाच्या संकटात राज्य सरकारच्या पाठीशी राहतील असा विश्वास होता. मात्र प्रत्यक्षात चित्र तसे राहीले नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकार खूप चांगले काम करीत असून देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांसाठी रुग्णालये उभी करण्यात आली आहेत. गुजरातची अवस्था किती बिकट आहे, त्याची अगोदर माहिती घ्या.











