सातारा : महान्यूज लाईव्ह
सातारा जिल्ह्यात खून, जबरीचोरी, घरफोडया करून धूमाकूळ घातलेला आणि गेल्या 4 वर्षापासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास पोलिसांनी शेजमुजराच्या वेषात सापळा रचून ऊसाच्या शेतातून शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून घरफोडीचे 10 गुन्हे उघडकीस आले असून 4 लाख 68 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. सातारा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
जक्कल उर्फ जकल्या रंगा काळे (रा. सुरुर) असे अटक केलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बसंल यांनी जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे यांची पथके तयार केली होती.
दरम्यान पोलीस रेकॉ़र्डवरील खून, जबरीचोरी, घरफोडी, चोरी आदी सारख्या गुन्ह्यात गेल्या 4 वर्षापासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार जक्कल उर्फ जकल्या याने फरार कालावधीत वाई, जावळी, कोरेगाव, खंडाळा, सातारा आदी परिसरात अनेक घरफोड्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खंडाळा तालुक्यात शेजमजुराच्या वेषात वेशांतर करून शोध घेतला. तब्बल अकरा दिवस पोलीस शेतमजुराच्या वेशात त्या परिसरात थांबले होते. तो 11 जुलै रोजी रेवडी (ता. कोरेगाव) येथे ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला आणि अखेर पोलीसानी सापळा रचून ऊसाच्या शेतातून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला कोरेगाव पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची कबुली दिली.
त्यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने कोरेगाव, वाठार, मेढा, वाई, भूईंज, सातारा तालुक्यात 10 घरफोड्या केल्याचे कबुल केले. त्याच्याकडून 4 लाख 68 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे हे या प्रकरणाच तपास करत आहेत.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बसंल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील,यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, सहायक उत्तम दबडे, तानाजी माने, पोलीस हवालदार कांतीला नवघणे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय काबळे, अतिश घाडगे, शरद बेंबळे, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडीक, प्रवीण फढतरे, प्रमोद सावंत, रवि वाघमारे, गणेश काटकर आदीच्या पथकाने ही कारवाई केली.