शिरूर : महान्यूज लाइव्ह
शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याकडून कोरोनाने मृत्यु पावलेल्या सभासदांच्या वारसांना तीन लाख रुपये तर कामगारांच्या वारसांना पाच लाख रुपये मदत घोडगंगा कारखान्याच्या संचालक मंडळ आणि व व्यवस्थापनाने द्यावी अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कोरोनामुळे शिरुर तालुक्यातील ३८४ व्यक्ती मयत झाल्या असून आज आखेर २४ हजार २२२ लोकांना कोरोनाची लागण झाली. कोरोनामुळे मयत झालेल्या सभासदांच्या वारसांना कारखान्याच्या वतीने ३ लाख रुपयांची मदत मिळावी. कोरोनामुळे तीन कामगारांचे निधन झाले आहे, तरी त्यांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत मिळावी.
सभासद व कामगारांची मेडिक्लेम विमा पॉलीसी काढण्यात यावी. कोणत्याही सभासदाचा व कामगाराचा कोणत्याही कारणाने मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसास ५ लाख रुपयांची मदत मिळणेकामी आर्थिक तरतुद अथवा विमा पॉलीसीच्या माध्यमातून योजना करावी. माळेगाव कारखान्याच्या प्रशासनाने सभासदांचा विमा काढल्यामुळे खुप मोठा फायदा सभासदांचा झाला. तसे घोडगंगा साखर कारखान्यांनीही करणे गरजेचे आहे.
जवळपास ४०० कोटी पेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणाऱ्या आपल्या घोडगंगा मध्ये आकस्मित निधीची तरतुद होणे गरजेचे असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांनी निवेदनात म्हटले आहे.











