डॉ. मोरे यांच्याऐवजी डॉ. चंदनशीवे यांच्याकडे वैद्यकीय अधिक्षकाचा कार्यभार
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूरातील कोरोनाग्रस्त मायलेकींना ईसीजी, क्ष किरण तपासणी व रक्त तपासणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी चक्क इंदापूरमध्ये फिरवल्यानंतर एकूणच आरोग्याबाबतच्या अनागोंदी स्थितीची दखल घेत उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांवर आरोग्य खात्याने तडकाफडकी कारवाई केली व डॉ. एकनाथ चंदनशिवे यांच्याकडे या उपजिल्हा रुग्णालयाचा कार्यभार दिला.
इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने आरोग्यसेवा संचालक डॉ. साधना तायडे यांनी ही कारवाई केली.
इंदापूरचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेश मोरे यांच्याबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यातच कोरोनाच्या रुग्णाची भर पडली. इंदापूरात उपचार सुरू असलेल्या कोरोनाग्रस्तांना क्ष किरण तपासणीसाठी खासगी दवाखान्यात फिरवण्याची वेळ आरोग्य प्रशासनावर आल्याने कोरोनाच्या उपाययोजनेसाठी तालुक्याचे प्रशासन गंभीर नव्हते अशीच चर्चा सुरू झाली. इंदापूरातील आरोग्य खात्यातील भोंगळ कारभार उघड झाला. त्यातून डॉ. मोरे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
मंगळवारी दोन कोरोनाग्रस्तांना क्ष किरण तपासणी करण्यासाठी शासकीय रुग्णालयात सुविधा नसल्याने एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. वास्तविक कोरोनाग्रस्तांना उपचारादरम्यान संबंधित उपचारकेंद्रातून हलवले जाऊ नये यासाठी अगोदरच तेथे पुरेशी व्यवस्था उभारली जायला हवी, मात्र इंदापूर तालुक्यात तशी सुविधा कोरोनाग्रस्तांना ठेवलेल्या सीसीसी केंद्रामध्ये नसल्याचे स्पष्ट झाल्याने तालुक्यात प्रचंड टिका झाली. या प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी इंदापूरातील पदाधिकाऱ्यांनी केली होती.
कोरोनाग्रस्तांबाबत अत्यंत सहजतेने आरोग्य विभागाकडून घेतले जात असल्याचे दिसल्याने व त्या तक्रारींमध्ये तथ्य दिसल्याने आरोग्य खात्याने आजच लागलीच कारवाई केली व डॉ. मोरे यांच्याकडील पदभार इंदापूरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंदनशीवे या्ंच्याकडे सोपविण्याचा आदेश दिला. या तडकाफडकी कारवाईने इंदापूर तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली.










