तीन तालुक्यात पुण्या-मुंबईतून तीन हजार जण
राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
दौंड : हमरीतुमरीवर आलो, पण तब्बल ५७ दिवस गाव सांभाळला, तालुका सांभाळला…पण आता पाहुण्यांनीच बेजार करून ठेवलंय…पुण्या-मुंबईला राहायला गेलेले पण आपलेच आहेत हो…पण, आता त्यांच्या येण्यानं कोरोना इथं येणार असेल तर?…नाय बा, आपल्याला तर नाही परवडणार…पण आम्ही येणारच, बघू कोण काय म्हणतंय..असं म्हणत मुंबईकर इकडं आले..आले ते आले..कोरोना बी संगतीला घेऊन आले.. इंदापूर व बारामतीत मुंबईकरांनीच कोरोना नव्याने आणल्याने दौंडकरही भारी चिंतेत आहेत…पुण्या-मुंबईचा पाव्हणा हिथं येऊन गावाची आबदा करणार असेल, तर असला पाव्हणा नगं गं बाई…अशी चर्चा आता गावागावात सुरू झाली आहे.
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात मुंबई पुणे वरून आलेल्यांची संख्या १००१ वर आहे, इंदापूर तालुक्यात ८४९ जण पुणे-मुंबईमधून आले आहेत. बारामती तालुक्यात मागील सात दिवसांत १२८८ जण कोरोनाबाधित क्षेत्रातून आले आहेत. या सर्वांना क्वारंटाईन केले असले तरी कोरोनोच्या धास्तीने मुंबई, पुणे सारख्या कोरोनाबाधित प्रभावित क्षेत्रातून आलेल्या लोकांमुळे सध्या खेड्यापाडयात,वाडयावस्यांवर चिंतेचे वातावरण आहे, इंदापूर व बारामती तालुक्यात नव्याने कोरोनाची लागण झालेले रुग्ण हे मुंबईतूनच आलेले असल्याने सध्या दोन्ही तालुक्यात पुण्या-मुंबईतून आलेला पाहुणा गावासाठी डोक्याचा ताप बनला आहे. आणि ही संख्या या तीन तालुक्यात सव्वा तीन हजारांवर पोचली आहे. इंदापूरमध्ये शिरसोडी येथील मायलेकीला कोरोनाची लागण झाली, तर बारामतीमध्ये मुर्टी गावात ज्या दोघांना कोरोनाची बाधा झाली, हे चारही जण मुंबईतून आलेले आहेत. त्यामुळे आजवर गावास कोरोनामुक्त ठेवण्यासाठी पाळलेले नियम, कठोरपणे केलेली अंमलबजावणी पाहुण्यांमुळे पाण्यात जाऊ लागल्याची गाववाल्यांची भावना वाढली आहे. दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत हजारांच्या वर आकडा गेला आहे, पाटस सारख्या मोठ्या गावातच ५० वर मुंबई पुणे वरून आलेल्यांची संख्या आहे, इतर गावांमध्ये ही अशीच परिस्थिती आहे,आरोग्य विभागाने सध्या त्यांना होम क्वारटाईन केले असले तरीही काही जण बिनधास्त पणे वावरत असल्याचे चित्र आहे..यामुळे स्थानिक नागरीक भिती व्यक्त करीत आहेत
डॉ. अशोक रासगे, तालुका आरोग्य अधिकारी दौंड – तालुक्यातील ग्रामीण भागात मुंबई पुणे वरून आलेल्यांची संख्या १००१ वर आहे या सर्वांना प्रतिबंधक तपासणी करून होम क्वारटाईन केले आहे, क्वारंटाईन केलेली व्यक्ती जर गावात फिरताना आढळली, कायद्याचे व नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, तशा सूचना तालुक्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या आहेत.










