बारामती : बारामतीच्या कृषीपंढरीतील कृषिक प्रदर्शनात चार दिवस दररोज मोठ्या संख्येने राज्यभरातील शेतकरी आले, त्यांनी येथे जगात आजच्या घडीला जे नवे आहे, ते पाहिले आणि आपल्या शेतीत ते नवतंत्रज्ञान पेरायचा संकल्प घेऊनच त्यांनी परतीचा मार्ग धरला.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने आयोजित कृषिक प्रदर्शनाचा आज चौथ्या दिवशी समारोप झाला. शेवटच्या दिवशीही आसपासच्या तालुक्यांतून शेतकऱ्यांनी कृषिक पाहण्यास गर्दी केली. या चार दिवसांत दोन लाखांवर शेतकऱ्यांनी कृषिक प्रदर्शन पाहिल्याची नोंद झाल्याचे केव्हीकेच्या सूत्रांनी सांगितले. या प्रदर्शनात एरवी जिरायती शेती उत्पन्नाअभावी परवडत नाही असे वाटणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जिरायती शेती ठिबक सिंचनावर साकारता येते व तिच्यातूनही बागायती पिकांप्रमाणेच नगदी चलन मिळू शकते, एवढेच नाही, तर ती किफायतशीर होऊ शकते हा मंत्र या प्रदर्शनाने दिला. आज सगळीकडे विषमुक्त शेतीचा बोलबाला आहे, अशावेळी अवघ्या दहा गुंठ्यात 43 प्रकारची धान्यांची शेती करून आपला वर्षभराचा विषमुक्त अन्नाचा साठा आपण करू शकतो हा देखील मूलमंत्र या प्रदर्शनाने दिला.
सतत दरवर्षी नवनव्या संकल्पना कृषिक मध्ये राबवून शेती व शेतकऱ्यांना नवा मंत्र देण्याची प्रथा पाडलेल्या कृषिक प्रदर्शनात यावर्षी शुगरबीट, ड्रोनद्वारे औषध फवारणी, मातीविना शेती, पाण्यावरची शेती, मासे व पाण्यावरती शेतीचा अॅक्वापोनिक्स आणि भविष्यातील एअरोपॉनिक्स म्हणजे हवेवरची शेती असे नवनवे तंत्र शेतकऱ्यांनी अगदी डोळे भरून पाहिले. शेतीतील नवे येऊ घातलेले औजारांचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांची गर्दी खेचणारे ठरले. तसेच हॅंगिंग प्रकारातील भाजीपाला व यापुढील काळात पालेभाज्या किंवा भाजीपाला देखील कलम करून घेतलेला व अधिक काळ चालणारा ठरेल हे पाहून त्यांनी असेच तंत्र शेतात वापरण्याचा संकल्प केला.











