महान्यूज : आजची गझल
डोक्यावर घे म्हणते त्याची पादत्राणे सुद्धा
जगून झाले आहे माझे जगाप्रमाणेसुद्धा
◆
टाळलेस तू वर्षांनंतर पुन्हा मला अन् कळले
तुला शोधता आले नव्हते नवे बहाणे सुद्धा!
◆
वाटावा अभिमान असेही रडून झाले माझे
हसलो आहे अनेकदा मी केविलवाणे सुद्धा!
◆
कोणीही जिंको वा हारो त्याला पर्वा नसते
तोच कबुतरे उडवत असतो तोच ससाणे सुद्धा!!
◆
चूक तरी म्हणणार कसे मी त्या वाटेवर जाणे ?
हजार वेड्यां सोबत दिसले चार शहाणे सुद्धा!
◆
तू निघताना मी थोडासा सुखावलोही होतो
सुंदर दिसले तुझे तुला भेटाया जाणेसुद्धा!!
◆
आधी त्यांच्या डोळ्यांवरती त्याचे चश्मे चढले
(गझल सारखे दिसले त्यांना मग रडगाणे सुद्धा)
◆
एखाद्याला मिठी द्यायला मरण उताविळ होते
एखाद्याशी मरण वागते माणुसघाणे सुद्धा!
◆
गझलकार- दत्तप्रसाद जोग,बिचोलीम, गोवा
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी-चिंचवड










