‘या केवळ बातम्या नाहीत, तर दुष्काळाची भयाण वस्तुस्थिती!’
राज्यात ओढवलेल्या कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बळीराजाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. आजच्या विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या धक्कादायक घटनांचा आधार घेत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “वृत्तपत्रांत येणाऱ्या या केवळ बातम्या नसून, ती राज्यातील दुष्काळाची विदारक वस्तुस्थिती आहे,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची हीच व्यथा सरकारदरबारी मांडण्यासाठी ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’चे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील विदारक परिस्थिती दर्शवणाऱ्या आजच्या तीन महत्त्वाच्या बातम्यांचा दाखला रोहित पवार यांनी आपल्या निवेदनात दिला आहे. यामध्ये दर्यापूर येथे नापिकीला कंटाळून कापूस उत्पादक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दुसऱ्या घटनेत, मेहकर येथे तीव्र पाणीटंचाईमुळे चार वर्षे पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेली मोसंबीची फळबाग एका शेतकऱ्याला नाइलाजाने जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट करावी लागली. तर तिसऱ्या घटनेत, राजस्थानमधून तब्बल २,००० किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या मेंढपाळांना दुष्काळाच्या झळांमुळे अकोटमध्येच रोखून त्यांच्या मेंढ्या परत पाठवण्याची वेळ आली आहे. या घटना राज्यातील शेती संकटाची तीव्रता स्पष्ट करतात, असे पवार यांनी नमूद केले.
दुष्काळाच्या खाईत लोटल्या गेलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीने दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी १ लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेली सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, रखडलेला पीकविमा वितरित करावा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेला बोनस लवकरात लवकर द्यावा, अशा सर्व मागण्या मान्य करून सरकारने बळीराजाला दिलासा द्यावा, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.










