शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर शहरातील लाटेआळी, आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवारी) सकाळी साडेसहाच्या सुमारास भरवस्तीत गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात हरी गंगावणे या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सकाळच्या वेळी नागरिकांची वर्दळ सुरू असतानाच गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे लाटेआळी परिसरात गोळीबाराचा आवाज ऐकून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी सुरू केली असून, गोळीबारात वापरण्यात आलेल्या काडतुसांचे अवशेष घटनास्थळावरून जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरील पुरावे आणि उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हरी गंगावणे यांच्यावर नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून गोळीबार केला, याचा तपास सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे. गोळीबारामागे पूर्ववैमनस्य, आपापसातील वाद किंवा अन्य काही कारण आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, तीनच दिवसांपूर्वी शिरूर शहर आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा शिरूर शहरातील भरवस्तीत सकाळच्या वेळी गोळीबाराची घटना घडल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शिरूर शहर आणि परिसरात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या घटनेतील आरोपींचा शोध घेऊन गोळीबारामागील नेमके कारण काय, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. या घटनेनंतर शहरातील नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.











