बारामती : तालुक्यातील पणदरे येथे घरातील झोपण्याच्या खोलीत ३० वर्षीय विवाहित महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैशाली तानाजी पवार (वय ३०, रा. पणदरे, ता. बारामती) असे मृत महिलेचे नाव आहे. अज्ञात व्यक्तीने तिच्या डोक्यात व चेहऱ्यावर अज्ञात हत्याराने वार केल्यानंतर टॉवेलच्या सहाय्याने गळा आवळून तिचा खून केल्याचा संशय आहे. या घटनेमुळे पणदरे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेआठ वाजण्यापूर्वी पणदरे येथील घरातील झोपण्याच्या खोलीत ही घटना घडली. वैशाली पवार या घरात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर कसल्यातरी हत्याराने मारहाण करण्यात आली. त्यानंतर टॉवेलने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणी मृत महिलेची सासू रंजना लक्ष्मण पवार (वय ५०) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २४६/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी १२ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊपासून १३ सप्टेंबर रोजी पहाटे २.५० वाजेपर्यंत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ करीत असून, दाखल करण्याची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक ओमासे यांनी केली. अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.











