बारामती महान्यूज लाईव्ह
पणदरे एमआयडीसी परिसरात गरोदर महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या गंभीर गुन्ह्याचा माळेगाव पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावला. संशयित आरोपीला ताब्यात घेत चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २४६/२०२६, बीएनएस कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पणदरे येथील वैशाली तानाजी पवार या महिलेचा घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली. तपासादरम्यान गणेश रामचंद्र माने (वय २६, रा. पणदरे) याच्याबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, मयत महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे डोरले व पायातील पैंजण आरोपीने काढून नेल्याचे पोलिसांना सांगितले. वैद्यकीय तपासणीत महिला गर्भवती असल्याचे तसेच तिच्या डोक्यात, मानेवर व गुप्तांगावर गंभीर जखमा असल्याचे समोर आले.
पोलिसांनी आरोपीकडे अधिक तपास केला असता गुन्ह्यात वापरलेला हातोडा, आरोपीचे कपडे तसेच मयत महिलेचे सोन्याचे डोरले व पैंजण त्याने लपविलेल्या ठिकाणाहून काढून दिले. तपासाच्या आधारे गुन्ह्यात योग्य ती कलमवाढ करण्यात आली आहे.
अटक आरोपीला न्यायालयाने १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे तसेच माळेगाव पोलीस ठाणे व स्था.गु.शा.च्या पथकाने केली.











