नवी दिल्ली : वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे देशातील सरकारी बॅंकांना तब्बल सव्वा लाख कोटींचा चुना लागला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या या माहितीत देशातील प्रमुख सरकारी बॅंकांचा समावेश आहे.
आतापर्यंत सन 2019 मधील फक्त आठ महिन्यातच 1.13 लाख कोटींचे घोटाळे उघडकीस आले आहेत आणि ते केवळ 18 सरकारी बॅकांचे आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते चंदशेखर गौर यांना ही माहिती रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे. विशेष म्हणजे यातील 26 टक्के चुना एकट्या स्टेट बॅंकेला लागला आहे. जी स्टेट बॅंक देशातील आघाडीची, शिस्तीची बॅंक आहे, तिला 30 हजार कोटींचा फटका बसला आहे. स्टेट बॅंकेत पावणेपाच हजार प्रकरणे ही गैरव्यवहाराची नोंदवली गेली आहेत. देशात फक्त नीरव मोदी, मेहुल चौक्सी यांची नावे लोकांना माहिती आहेत, मात्र इतरही अनेक जण अशा घोटाळ्यातले आहेत. पंजाब नॅशनल बँकेला 15 हजार कोटींचा चुना 294 प्रकरणात लागला. देशातील 18 सार्वजनिक सार्वजनिक बँकांच्या 8 हजार 900 घोटाळ्यांपैकी ही देखील एक आघाडीची बॅंक आहे, ज्यामध्ये मेहुल चौक्सीचे नाव पुढे आले.
युनायटेड बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेसह युको बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बॅंकेचाही यामध्ये समावेश आहे, या सर्व बॅंकांमध्ये मिळून 31 हजार कोटींचा फटका बसला आहे. अलाहाबाद बँकेला 6 हजार 700 कोटींचा, बँक ऑफ इंडियाला 6 हजार 621 कोटींचा, बँक ऑफ बडोदा बॅंकेला अडीचशे प्रकरणांमध्ये 11 हजार कोटींचा, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सला 4 हजार 899 कोटींचा, युनियन बँक ऑफ इंडियाला 5 हजार 600 कोटींचा, इंडियन ओव्हरसीज बँकेला साडेपाच हजार कोटींचा फटका बसला.










