इंदापूर : महान्यूज लाईव्ह
बारामती बावडा मार्गावर इंदापूर तालुक्यातील कळंब गावाच्या हद्दीत मानवी पायाचा तुटलेला भाग सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंब येथील एका हॉटेलपासून सुमारे 500 ते 700 मीटर अंतरावर डाव्या पायाचा गुडघ्याखालचा भाग रस्त्याच्या कडेला आढळून आला. हा भाग पुरुषाचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून परिसराची पाहणी केली असून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
या घटनेमागे अपघात, गुन्हा की इतर काही कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे गोळा करून तपास सुरू असून पुढील चौकशीदरम्यान अधिक माहिती समोर येणार आहे.











