इंदापूर : महान्यूज लाइव्ह
इंदापूर तालुक्यात आज सकाळपर्यंत वीस जण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर हा आकडा संध्याकाळपर्यंत वाढतच राहिला. संध्याकाळी आलेल्या अहवालात नव्याने 14 जण कोरोना बाधित आढळून आले असून नव्याने काही गावात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
इंदापूर तालुक्याचा कोरोनाग्रस्ताचा संख्येचा प्रवास हा बारामती पाठोपाठ सुरू असून लवकरच तो 400 चा आकडा गाठणार असे चित्र होते, मात्र आज एका दिवसात तब्बल 34 जण कोरोनाग्रस्त आढळल्याने आजच इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 393 झाली आहे. आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये उद्धट येथे दोघेजण आढळले असून यामध्ये 38 वर्षीय पुरुष व पन्नास वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
वालचंदनगर येथे पाच जण कोरोनाबाधित आढळले असून एकाच कुटुंबातील चार जणांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये 50 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय महिला व तीस वर्षीय महिलेचा समावेश आहे,तर याच गावामध्ये दोन वर्षीय चिमुकल्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. बोरी येथे 42 वर्षीय पुरूषास कोरोनाची लागण झाली असून भाटनिमगाव येथे 36 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाली आहे. भिगवण येथे 62 वर्षीय पुरुषास कोरोना ची लागण झाली असून भवानीनगर येथे 65 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. भवानीनगर येथे आणखी एका पुरुष रुग्णास कोरोना ची लागण झाल्याचा खाजगी प्रयोगशाळेचा अहवाल आहे. इंदापूर शहरात आजदेखील तीन रुग्ण आढळले असून इंदापूर शहरातील 72 वर्षीय पुरुषास तसेच राजवलीनगर येथील चाळीस वर्षीय पुरुषास व जनता बँकेसमोर शहर परिसरातील 60 वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे.











