आत्तापर्यंत २०२० जणांची मात : ७९ रूग्ण दगावले
माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – गेली चार महिने विश्रांती घेतलेल्या कोरोनाचा फैलाव पुन्हा वेगाने सुरू झाल्याने भोर तालुका हादरला. एका दिवसात अकरा जणांची भर पडली. कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आजअखेर
भोरमध्ये कोरोनाच्या आकड्याने तब्बल दोन हजाराचा आकडा पार केला असून आत्तापर्यंत ७९ रूग्ण दगावले आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
भोर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासन गेली वर्षभर तारेवरची कसरत करत असतानाच गेल्या एकाच आठवड्यात शंभराहून अधिक कोरोना बाधितांची भर पडली पडल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून तालुकावासीयांची चिंता वाढली आहे.
विवाह सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी प्रामुख्याने कोरोनाचा फैलाव होण्यास कारणीभूत मानली जात आहे. तालुक्यात आजपर्यंत २१४९ कोरोना बाधित आढळले असून २०२० जणांनी कोरोनावर मात केली असून ५० रूग्णांवर उपचार सुरु असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.
शहरातील कामगार आणि ग्रामीण भागातील काही बेशिस्त नागरिकांच्या बेशिस्तीमुळे केवळ एका आठवडयात भोर तालुक्यात कोरोना बाधितांची अधिक भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अत्यावशक आणि वैद्यकीय सेवा वगळता प्रतिबंधित क्षेत्रात प्रशासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विनामास्क तसेच गर्दी करणाऱ्या नागरिकांवर रोज पोलीस कर्मचारी कारवाई करत असल्याचे राजगडचे पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी सांगितले.
कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भोर तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. रूग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र बाहेरगावी आणि शहराकडे नोकरीला जाणा-या कर्मचा-यांना कोरोनाची लागण होत असून त्यांच्या संपर्कातील लोकांनाही करोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात कोरोनाचा एकीकडे आकडा दोन हजाराच्या वर जाऊनही काही नागरिक गांभीर्य घेत नसून विनामास्क व विनाकारण बेशिस्त नागरिक मोठ्या संख्येने अद्याप बाहेर फिरताना दिसत आहेत. यामुळे येणारा काळ तालुक्यासाठी अधिक आव्हानात्मक असणार आहे.
अजित पाटील, तहसीलदार, भोर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी भागात ठराविक अंतरावर प्रतिबंधित भाग घोषित करण्याच्या कार्यवाही सुरू असून दुकानदार आणि नागरिकांनी सुद्धा नियमांचे पालन करावे. शिस्तीचे पालन न करणाऱ्यावर कारवाई करण्याचे पोलिसांना सूचना देण्यात आले आहे.
भोर तालुका कोरोना संकिर्ण माहिती
एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या २१४९.
उपचारानंतर घरी सोडलेले रुग्ण २०२०
आत्तापर्यंत स्वब तपासलेले नागरिक – १२१३६
एकूण मृत रुग्णसंख्या – ७९
सध्या उपचार घेत असलेले रुग्णसंख्या – ५०











