बारामती – महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या संकटात अगोदरच लॉकडाऊनमुळे गव्हाच्या कापणीची यंत्रणा मिळत नसतानाच कापणीला आलेल्या गव्हावर आज अवकाळीचे पाणी पडले. तीन महिने कष्टाने व घामाने पिकवलेल्या गव्हाला आज या पावसाने अवकळा आली. दुसरीकडे निर्यातीने ठेंगा दाखवलेल्या द्राक्षाची स्थानिक बाजारात कशीतरी विक्री होत होती. त्या द्राक्ष उत्पादकांच्या स्वप्नालाही घडांबरोबर तडे गेले..
अवकाळी पावसाने आज अचानक हजेरी लावल्याने आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. काल रात्री पंतप्रधानांनी संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्याची घोषणा केल्यानंतर आता शेतात मशागतीसाठी फिरवायच्या ट्रॅक्टरला डिझेल कोठून आणणार हा प्रश्न समोर असतानाच आज दुपारी अचानकच आभाळ भरून आले आणि होत्याचे नव्हते झाले. दोन दिवसांपूर्वी आभाळ भरून आले होते. मात्र त्यातून पाण्याची गळती लागेल असे काही चित्र नव्हते. त्यामुळेच आजही शेतकरी तसे निर्धास्त होते. मात्र त्यांच्या या निर्धास्तपणाला पावसाने भीतीमध्ये परावर्तित केले.
आज दुपारपासून सुरू झालेला पाऊस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरूच होता. अगोदरच कोरोनाच्या भीतीने पंजाबमधून हार्वेस्टर आलेले नाहीत. स्थानिक ठिकाणी ज्यांच्याकडे हार्वेस्टर आहेत, त्यांच्याकडे डिझेल नसल्याने त्यांनी दर वाढवले आहेत. तर दुसरीकडे काढून टाकलेला गहूदेखील भिजल्याने आता पुढे काय करायचे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. यावर्षी शेतीचे उत्पादन घटणार असल्याने दर वाढून मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना कोरोनापेक्षा अस्मानी संकटाने आज विचार करायला भाग पाडले.
दुसरीकडे द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान या पावसाने केले. सध्या मागास छाटणीतील द्राक्षे काढणीच्या टप्प्यात आहेत. या द्राक्षांच्या घडांमध्ये पाणी शिरून मणी फुटण्याचा धोका निर्माण झाला असून काढणी सुरू असलेल्या द्राक्षबागांचे पूर्णतः नुकसान झाले आहे.











