मुंबई : महान्यूज लाईव्ह
जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून त्यातून महाराष्ट्रही वाचलेला नाही.. महाराष्ट्रातही दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात संचार बंदी जाहीर करण्यात आली असल्याने ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागरिकांना घरातच थांबून शांत बसण्याऐवजी पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शासन पातळीवर अनेक कठोर निर्णय घेतले जात आहेत. त्यातच राज्यात आता संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपला पुस्तक वाचतानाचा एक फोटो ट्विट करत सोबतीला नागरिकांनी घरी थांबून पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला आहे.
शरद पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, पुस्तक हा माणसाचा खूप चांगला मित्र आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग करताना घरातच बसण्याची वेळ आल्यावर लोक विचारतात तुम्ही काय करता आहात? मी सांगतो… घरी पुस्तक वाचत आहे. #StayHomeStaySafe घरातच थांबा, सुरक्षित राहा!










