कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती आणि मावळ मतदारसंघात उपक्रम
बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात भयावह स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच या आजाराबद्दल असलेल्या समज-गैरसमजामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती आणि मावळ लोकसभा मतदारसंघात तब्बल दिड लाख मास्कचे मोफत वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच या उपक्रमाअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी विविध संस्थांच्या माध्यमातून मास्कच आणि सॅनेटायझर अशा वस्तूंचे वाटप केले जात आहे. बारामती आणि मावळ लोकसभा मतदार संघातही पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने मोफत मास्क वाटप आणि कोरोनाबद्दल जनजागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे.
फाउंडेशनच्या वतीने बारामती शहरातील नगरपालिका, भिगवण चौक, बस स्टॅन्ड , पोलिस ठाणे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांना मोफत मास्क वाटप करण्यात आले. मास्क सोबतच कोरोनोपासून कसा बचाव करावा याची माहिती नागरिकांना देण्यात आली.
नागरिकांना कोरोनापासून संरक्षण करता यावे, त्याचबरोबर त्यांच्यात कोरोनाबद्दल जनजागृती होऊन या रोगाचा प्रसार टाळावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. बारामती आणि मावळ या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि मास्क वाटप कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचेही फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.










