दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुका भारतीय जनता पक्षाचे वतीने वाढीव विज बिल माफीसह विविध मागण्यासाठी केडगाव येथील महावितरण वीज कंपनीच्या कार्यालयासमोर आज सोमवारी ( ता.23) वीज बिलाची होळी करण्यात आली. यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीज बिले आली. सर्वसामान्य नागरीकांना आर्थिक परिस्थीतीमुळे वीज बिले भरता आली नाही. तसेच वीज बिले भरण्यासाठी महावितरण वीज कंपनी तगादा लावत आहे. यामुळे दौंड भाजपचे आमदार राहुल कूल व भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कांचन कूल यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी ( ता.23 ) दौड तालुका भाजपच्या वतीने शेतकरी, लघु उदयोजक व घरगुती वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दौंड तालुक्यातील ग्रामिण भागातील केडगाव येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ‘विजबिलांची होळी’ करून आंदोलन करण्यात आले.
यावेळी वीज बिले माफ करावीत, रोहीत्रे तसेच ग्रामिण भागातील प्रलंबित विद्युत कामे मार्गी लावावीत असी मागणी यावेळी करण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, माजी तालुकाध्यक्ष गणेश आखाडे, तानाजी दिवेकर, शिवाजी दिवेकर आदींसह कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.










