पुणे : महान्यूज लाईव्ह
‘नेता म्हणून नव्हे, तर कार्यकर्ता म्हणून विधानपरिषदेवर निवडून द्या’ अशी भावनिक साद घालत पुणे पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नीता ढमाले यांना या हाकेचा चांगलाच फायदा झालेला पहायला मिळत असून मतदारसंघाच्या पाचही जिल्ह्यातील तरुण मतदारांचा उत्स्फूर्तपणे नीता ढमालेंना पाठींबा असल्याचे चित्र त्यांच्या दौऱ्यात पाहायला मिळत आहे.
एक महिला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला उमेदवारी देईल असा त्यांना विश्वास होता, मात्र ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानंतरही त्यांनी ठामपणे अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ढमाले यांनी स्वतः स्पर्धापरिक्षेच्या क्षेत्रात काम केले असल्याने त्यांना स्पर्धापरिक्षा क्षेत्रातील पदवीधर मतदारांचा चांगला पाठींबा मिळत आहे.
पुण्यातून आपल्या प्रचाराची झंझावाती सुरुवात करुन त्यांनी विरोधकांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे. पुण्यातील दिग्गज राजकीय मंडळींच्या आपला निवडणूक अर्ज दाखल करुन त्यांनी आधीच आपल्या राजकीय ताकतीची दखल घ्यायला सर्वांना भाग पाडले आहे.
साताऱ्यात प्रीतिसंगम येथील स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन (दि.२०) त्यांनी पदवीधर मतदारांशी संवाद साधला. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासाठी चव्हाण साहेबांनी कशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना, विशेषतः महिलांना दिलेल्या संधी दिल्या याची त्यांनी माहिती दिली. आपणही त्यांच्याच विचारानुसार काम करुन पदवीधरांना प्रामाणिक न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहू असा विश्वास देऊन त्यांनी मतदारांना भावनिक साद घातली. साताऱ्यापाठोपाठ सांगली (दि.२२) दौऱ्यातही त्यांच्या मतदार मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे.
कोणताही राजकीय वारसा नसताना आपल्या प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण कामाच्या जोरावर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्धार विरोधकांनाही दखल घ्यायला भाग पाडणारा आहे. एक महिला ज्या ताकतीने प्रस्थापित राजकारणाला शह देण्यासाठी लढत आहे ते पाहून सर्वच स्तरांतून ढमालेंचे कौतुक होत आहे.
मतदारसंघातील विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांशी असणारे त्यांचे सलोख्याचे संबंध ही त्यांची जमेची बाजू आहे. आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या पदवीधरांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडून निवडणुकीत आपल्या विजयाची दावेदारी त्यांनी स्पष्ट केली आहे. मतदारांमध्येही प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांविषयी नाराजी असून नीता ढमाले यांच्या रूपाने एक नवा चेहरा पुणे पदवीधरला आमदार म्हणून मिळेल असा विश्वास अनेक मतदारांना आहे.











