इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज वीजबिले जाळून महाआघाडी सरकारचा निषेध केला.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांचेकडून महावितरणचे उपअभियंता रघुनाथ गोफणे यांनी वीज बील माफीच्या मागणीचे निवेदन स्विकारले.
महाविकासआघाडी सरकारने दिलेले आश्वासन न पाळून राज्यातील ग्राहकांची, उद्योग व्यवसाय करणाऱ्यांची व शेतकऱ्यांची कोरोनाच्या संकटात फसवणूक केली आहे. असा आरोप भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले , जनतेने ऊर्जामंत्र्यांकडे लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करण्याबत केलेल्या मागणीबाबत दिलासादायक निर्णय घेण्याचे आश्वासन ऊर्जा मंत्र्यांनी दिले होते. परंतु मीटर रिडींग प्रमाणे आलेली वीज बिले माफ होणार नाहीत असे ऊर्जामंत्र्यांनी आता जाहीर केले आहे, त्यामुळे वीज वितरण कंपनीने विज बिले वसुलीचा तगादा लावला आहे.
लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय बंद असल्याने वीजबीले कमी यायला हवी होती. परंतु जास्त वीजबीले आकारण्याचे काम महावितरण कंपनीने केले. लॉकडाऊनमुळे शेतकरी, सामान्य नागरिक, व्यवसायिक, नोकरदार वर्ग, यांच्यापुढे आर्थिक संकट उभे असल्याने ते वीज बीले ताबडतोब भरू शकणार नाहीत. वाढीव वीजबील आकारणी, संगणकीय चुका यासारख्या अनेक चुका या सरकारने केल्या असल्याने जुलमी वीज बिलांची आज राज्यभर होळी करण्याचा निर्णय भाजपने घेतला. शासनाने वीजबिलांची संपूर्ण माफी केल्याशिवाय भाजप गप्प बसणार नाही. असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला.
लॉकडाऊन काळातील वीजबील वसुलीचा शासनाने काढलेल्या फतवा जुलमी व अन्यायकारक आहे. राज्यातील जनता व शेतकरी सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याने शासनाने हा फतवा मागे घेऊन लॉकडाऊन काळातील वीज बील माफीचा आदेश तात्काळ काढावा. सध्याच्या परिस्थितीत इंदापूर तालुक्यात ट्रान्सफॉर्मर जळाला तर मिळत नाही. सध्या तालुक्यातील 20 ते 25 गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद आहेत. मंत्री म्हणून आपण मिरवता परंतु जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. शंभर टक्के वीज बिल माफ करू, संपूर्ण कर्जमाफी करू, मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाचे प्रश्न सोडवू असे आश्वासन या लोकप्रतिनिधीने दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजून भरपाई मिळाली नाही. लोकप्रतिनिधी सरकारचे प्रतिनिधी असल्याने त्यांची जबाबदारी आहे. अनेक प्रश्न सोडविण्यात तालुक्याचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याने नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
यावेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष ॲड. शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद, ॲड. कृष्णाजी यादव, पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांची भाषणे झाली. या आंदोलनामध्ये तालुक्यातील पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.











