काटेवाडी – काटेवाडीने मागील दहा वर्षात निर्मलग्राम, संतुलीत पर्यावरणग्राम, तंटामुक्त गाव, इकोव्हिलेज, सायबरव्हिलेज अशा अनेक बाबतीत राज्यभर ठसा उमटवला. तसा काटेवाडीला राजकीय सोहळा नवा नाही..किवा राजकीय नेते, त्यांच्या भेटी अथवा मिरवणूकाही नवीन नाहीत. गेली पाच दशके हा सोहळा येथे सुरूच असतो..मात्र गेल्या काही महिन्यांपासून इथल्या वेगळ्या मिरवणूका नजरेत भरताहेत..मध्यंतरी पुरस्कार मिळालेल्या मुख्याध्यापिकेचीच मिरवणूक गावाने काढली..आता गावातल्या ज्या मुलांनी राज्य़ात, देशात खेळामध्ये गावाचे नाव उज्वल केले, त्यांचा सत्कार सोहळा, त्यानिमित्ताने मिरवणूकीचा भारही गावकऱ्यांनी खांद्यावर झेलला..!
काटेवाडीत मागील दोन महिन्यापूर्वी जिल्हा परीषद शाळेच्या मुख्याध्यापिका राणी ढमे यांची वाजतगाजत मिरवणूक काढली आणि त्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात झाली होती. दोन दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी गावातील ज्या सुपुत्रांनी खेळामध्ये अटकेपार झेंडे लावले, त्यांची मिरवणूक काढत गावचे वेगळेपण दाखवून दिले. शिवछत्रपती पुरस्कार विजेता कुस्तीपटू उत्कर्ष काळे, गोळाफेकीत राज्यात उत्कृष्ठ ठरलेला शंतनू जाधव, ज्युदोची राष्ट्रीय खेळाडू श्रुतिका कांबळे,कबड्डीचा राष्ट्रीय खेळाडू ओम काटे, बी.ए.एम.एसमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली ऋतुजा काटे यांचा सत्कार सोहळा केला व यानिमित्ताने मिरवणूक गावाने काढली. गेल्या काही दिवसांपासून गावात कबड्डीच्या स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुरू होती. या गावातील घडामोडींवर अजित पवार यांच्या पत्नी व हायटेक टेकस्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे बारकाईने लक्ष असते. त्यांनी या कबड्डीच्या निमित्ताने गावात क्रिडामय वातावरण होणार आहे, तर गावातील क्रिडापटूंचाच गौरव करा, यानिमित्ताने या परिसरालाही आपल्या गावातून किती मोठे खेळाडू घडताहेत याची माहिती होईल अशी सूचना केली आणि गाव तयारीला लागले. गावकऱ्यांनी या गावच्या सुपुत्रांची लेझीम, बेंजो, दारुगोळ्याच्या आतषबाजीत मिरवणूक काढली. सुनेत्रा पवार यांनी या सर्वांचे सत्कार केले. यावेळी पवार कुटुंबातील एक सदस्य व राष्ट्रीय कबड्डीपटू निता पाटील, राष्ट्रीय कबड्डीपटू रंजना पोतेकर, कबड्डीपटू स्मिता खरात याही उपस्थित होत्या. स्मिता खरात यांनी तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने थेट मैदानात कबड्डीच्या खेळाडूसारखीच एन्ट्री मारत खेळाडू हा आयुष्यभर खेळाडूच असतो हे दाखवून दिले.










