महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
आज (ता.२९ ) मंत्रिमंडळ बैठक झाली, या बैठकीत ठाकरे सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले.यामध्ये सध्याचा शिवभोजन थाळी चा पाच रुपयाचा दर पुढील सहा महिन्यापर्यंत वाढविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली तसेच कोरला संक्रमणामुळे नगरपंचायती, नगरपरिषदांचे प्रशासक पुढील कालावधीतही कायम राहणार असल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले.
हे महत्त्वाचे निर्णय थोडक्यात.
शिवभोजन थाळीचा दर १ ऑक्टोबर २०२० पासून पुढील ६ महिन्यांसाठी ५ रुपये करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे या पुढील सहा महिन्यापर्यंत शिवभोजन थाळी फक्त पाच रुपयात मिळणार आहे याचा राज्यातील लाखो लाभार्थ्यांना फायदा मिळेल.
मुदत संपलेल्या व कोरोना विषाणु संक्रमणामुळे निवडणूका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढविणार असून त्याचा अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली. निवडणुका न झालेल्या 12 नागरी स्थानिक संस्थांमधील प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी 6 महिन्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय असून
मे व जून 2020 मध्ये मुदत संपलेल्या 3 महानगरपालिका, 8 नगरपरिषदा व एका नगरपंचयायतीच्या निवडणुकीची प्रक्रीया कोविडमुळे स्थगित करण्यात आली आहे.
राज्य निवडणुक आयोगाच्या सूचनेप्रमाणे या संस्थांमध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियक व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये प्रशासकाचा कालावधी 6 महिन्यापेक्षा जास्त करण्यासंदर्भात सुधारणा करणे गरजेचे होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत शाखेचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील रायगड जिल्ह्यात प्रस्तावित बल्क ड्रग पार्क व औरंगाबाद ऑरिक सिटी येथे वैद्यकीय उपकरण पार्क प्रकल्पाकरिता विशेष प्रोत्साहने देण्यास मान्यता देण्यात आली.
राज्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्यासाठी मा बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना सुरू करण्यात येणार आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली असून नव्याने निविदा मागविणार आहे.
मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकार इमारतींच्या जलद पुनर्विकासकरिता नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आली.











