पुणे सोलापूर महामार्गावर पाटस येथे पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण पथकाची कामगिरी
दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर रात्री पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सिनेस्टाईल यवत ते पाटस असा 25 किलोमीटर पाठलाग करून चोरीला गेलेली एक बोलेरो जीप पकडली, गाडीचा चालकच चोर निघाला.
मावळ तालुक्यातील पवनानगर येथून ही गाडी चोरीला गेली होती. ही गाडी पाटस येथे पकडण्यात आली. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी माहिती दिली.
विजय रमेश सोनकांबळे (वय २० वर्षे रा.पवनानगर, ता.मावळ जि.पुणे मूळ रा. जयभिमनगर, गल्ली नं.३, नांदेड जि. नांदेड) असे या वाहन चोरणाऱ्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, २७ ऑक्टोबर रोजी पवनानगर (ता.मावळ ) येथील मंगेश रामचंद्र कालेकर यांची महिंद्रा बोलेरो जीप (नं. एमएच १४ सीसी ७९४७ ) ही चोरीस गेली होती. कालेकर यांनी दिवसभर गाडीचा शोध घेतल्यानंतर सायंकाळी सहा वाजता लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला गाडी चोरीची तक्रार दाखल केली होती. कालेकर यांचा कामगार वाहन चालक विजय सोनकांबळे हा सुद्धा गायब झाला होता. यामुळे त्यानेच ही जीप चोरी करून पोबारा केल्याची शक्यता असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
त्यानुसार पोलीसांनी तात्काळ चोरी झालेल्या जीपचा नंबर व वर्णनासह माहिती नियंत्रण कक्षा मार्फत वायरलेस व पोलीस व्हॉटसअप ग्रुपवर देवून तिचा शोध घेणेबाबत अंमलदार यांना सुचना दिलेल्या होत्या.
सदर जीप चोरीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी बोलेरो जीप चोरी बाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या व्हॉटसअप ग्रुपवर सर्व अमलदारांना देवून जीपची माहिती घेणेबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस हवालदार सचिन गायकवाड यांना ही बोलेरो जीप ही पुणे बाजूकडे गेलेली असून ती पुणे सोलापूर महामार्गावरून नांदेड दिशेला घेवून जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली. पुणे सोलापूर महामार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास ही जीप प्रवास करत असल्याचे निदर्शनास आल्याने तीला थांबण्याचा इशारा केला, परंतु वाहनचालकांने ती न थांबवल्याने यवतपासून तिचा सिनेस्टाइल पाठलाग करून पाटस येथील टोल नाक्या जवळ ही जीप व वाहनचालकाला ताब्यात घेतले.
हा वाहनचालक व गुन्हयात चोरलेली बोलेरो जीप पुढील कारवाईसाठी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिल्याची माहिती घनवट यांनी दिली.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पो हवालदार सचिन गायकवाड, महेश गायकवाड,निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, गुरु जाधव यांच्या पथकाने केली.











