माझ्याच घरी माझे कुटुंब माझी जबाबदारी पथके आली नाहीत आणि तपासणी झाली नाही: भरणे
इंदापूर महान्यूज लाईव्ह
याचा व्हिडीओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता.
इंदापूर तालुक्यातील नुकसानीच्या बाबतीत इंदापुरात आज झालेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे समाधानकारक काम केले नसल्याचे निदर्शनास येताच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे अधिकाऱ्यांवर भडकले. दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे न झाल्यास संबंधित अधिकार्यांवर थेट कारवाई करणार असल्याचा इशारा पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिला. इंदापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना अतिवृष्टीमुळे इंदापूर तालुक्यातील किती घरे पडली असा प्रश्न केल्यावर त्याचे उत्तर देता आले नसल्याने भरणे यांनी अधिकाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली.
आज (शनिवारी) इंदापूर तालुक्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली. यावेळी तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीत अधिकाऱ्यांवर कामाच्या पद्धतीवर टीका करत नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून कोणीही पंचनाम्या पासून वंचित राहू नये असे स्पष्ट करत सोमवार सकाळपर्यंत तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे सर्व पंचनाम्याच्या अहवाल द्यावा व त्याची एक प्रत माझ्याकडे पाठवावी असा स्पष्ट आदेश अधिकाऱ्यांना दिला.
14 ऑक्टोबरला इंदापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने इंदापूर तालुक्यातील शेतीपिकांचे त्याचबरोबर नागरिकांच्या घरांचे व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र इंदापूर तालुक्यात अधिका-यांकडून राज्यमंत्री भरणे यांना समाधानकारक कामकाज पहायला मिळाले नाही. उपस्थित अधिकाऱ्यांनी राज्यमंत्र्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न दिल्याने भरणे अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. भरणे यांनी संतप्त होत ऑफिस मध्ये बसून कागदे रंगवू नका, तर तळागाळात जाऊन कामे करा. परिस्थितीचा गांभिर्याने विचार करा. मला कारणे नको आहेत, तर प्रत्यक्षात काम पाहिजे त्यामुळे असली टोलवाटोलवी मला चालणार नाही. अशा शब्दांत अधिका-यांची कानघडणी केली. यापुढे कामात कुचराई कराल तर थेट कारवाई करणार असल्याचा इशाराच अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी उपविभागीय दंडाधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल, वैद्यकिय अधिकारी डाॅ.सुहास शेळके, इंदापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश लोकरे, कृषी अधिकारी रुपनवर, महावितरणचे रघुनाथ गोफणे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, नगरपालिका विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, नगरसेवक अमर गाडे आदींसह विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, अतिवृष्टीने शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. इंदापूर तालुक्यातील परिस्थिती सोलापूर पेक्षा अतिशय वाईट आहे. सोलापूरच्या तुलनेत इंदापूर तालुक्याचे नुकसान जास्त झाले आहे मात्र कागदावर नुकसानीची आकडेवारी दिसत नाही. अधिकारी वर्गाने एका ठिकाणी बसून पंचनामा करता प्रत्यक्ष नुकसान झालेल्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून स्वतः खात्री करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत. शिवाय नुकसानीचा प्रकार पाहून अटी, शर्ती यावर बोट न ठेवता थेट कागदावरती पंचनामा घ्यावा. तालुक्यातील कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा पासून वंचित राहता कामा नये. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एखादा व्यक्ती पंचनाम्याच्या प्रक्रियेतून वंचित राहिला तर त्यास संबंधित अधिकारीस जबाबदार धरून त्यावर थेट कारवाई केली जाईल. प्रत्येक अधिकाऱ्याने आपण केलेल्या कामकाजाचा अहवाल स्वतः मला सादर करावा. तालुक्यातील झालेल्या नुकसानीचे कामकाज मार्गी लागेपर्यंत कोणीही आपापले मुख्यालय सोडू नये. सर्व अधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत कोणतीही सबब न सांगता सोमवारी सकाळी तहसीलदार सोनाली मेटकरी व प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यापुढे आपापले कामकाजाचे अहवाल सादर करावेत अशा स्पष्ट सूचना दत्तात्रय भरणे यांनी दिल्या आहेत.
दरम्यान राज्यमंत्री भरणे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून तालुक्यातील सद्यस्थितीची माहिती घेतली. किती हेक्टर शेतीचे नुकसान झाले ? त्यात कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले आहे ? किती घरे जमीनदोस्त झाले आहेत ? शिवाय किती घरांची पडझड झाली आहे ? पशुधनाचे किती नुकसान झाले ? यासह इतर प्रश्न अधिकाऱ्यांना विचारले मात्र भरणे यांच्या या सर्व प्रश्नांना अधिकारीवर्ग समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही.
तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी तालुक्यातील कोरोना स्थिती बद्दल सर्व माहिती दिली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ठेंगल यांनी शहरातील माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबद्दल संपूर्ण परिस्थितीचा आढावा दिला. शहरातील परिस्थितीवर दत्तात्रय भरणे यांनी समाधान व्यक्त केले, मात्र ग्रामीण भागातील माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबद्दल समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कारणे न देता उर्वरित सर्वेक्षण तात्काळ पूर्ण करा अशा सूचना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
दत्तात्रेय भरणे : मी व माझे कुटुंब तालुक्यातील एक असून “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहीमे अंतर्गत माझ्याच कुटुंबापर्यंत अद्याप पर्यंत कोणीही पोहोचलेले नाही. ज्या दिवशी माझ्या कुटुंबाची व माझी तपासणी संबंधित यंत्रणेमार्फत होईल त्या दिवशी मला विश्वास बसेल की कामकाज व्यवस्थित चालू आहे.











