महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री तुम्ही मातोश्रीबाहेर निघा, ते बाहेर पडत नाहीत असा विरोधकांचा आरोप होत होता, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सोमवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत.
दुसरीकडे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, त्यातही बारामती, इंदापूरमध्ये महापूराच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सोमवारी सकाळी ९ वाजता विमानतळावरून शासकीय विश्रामगृहाकडे व तेथून मोटारीने अकक्लकोट तालुक्यातील सांगवी खुर्द येथे पाहणी करणार आहेत सकाळी ११ वाजता सांगवी पुलाकडे बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी करणार असून अक्कलकोट शहर व हत्ती तलावाची पाहणी करणार आहेत. दुपारी १२ वाजता रामपूर येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करून बोरी उमरगे येथील शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. दुपारी तीन वाजता ते शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन मुंबईकडे निघणार आहेत.
दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही १९ ऑक्टोबर रोजी महापूराच्या नुकसानीची पाहणी पुणे जिल्हयात करणार आहेत. फडणवीस हे बारामतीतून महापूराच्या नुकसानीची पाहणी करण्यास सुरवात करणार आहेत. बारामतीतील पाहणी केल्यानंतर ते कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परांडा येथे पाहणी करून उस्मानाबाद येथे जाणार आहेत. २० ऑक्टोबर रोजी ते उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील महापूराने ग्रस्त असलेल्या भागांना भेटी देणार आहेत.











