येत्या बुधवारी संचालक मंडळाची तातडीची बैठक होणार
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
छत्रपती कारखान्यातील कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांना कायम हंगामी सेवेत समाविष्ठ करण्याच्या मागणीवर येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिले.
दरम्यान या मागणीसाठी कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मात्र छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संचालक राजेंद्र गावडे, नारायण कोळेकर, निवृत्ती सोनवणे, गोपीचंद शिंदे आदींनी कामगारांशी चर्चा केली. कामगारांच्या बाजूने शिवसेनेचे सतीश काटे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडूरंग रायते यांनी बाजू मांडली.
तीन वर्षापूर्वी या कंत्राटी तत्वावरील कामगारांना तीन वर्षानंतर कायम हंगामी सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कामगारांनी ही मागणी केली, मात्र त्याकडे लक्ष देण्यात येत नसल्याची तक्रार करीत गळीत हंगामाच्या बॉयलरअग्नीप्रदिपन कार्यक्रमावेळी कामगारानी संचालक मंडळाचे लक्ष वेधले. मात्र त्यानंतरही काहीच कार्यवाही होत नसल्याने कामगारांमध्ये नाराजी होती.
आज या कामगारांनी ठिय्या आंदोलन करीत आश्वासनाची पूर्तता अगोदर करण्याची मागणी केली. त्यास शेतकरी संघटनेने पाठींबा देत तीन वर्षापूर्वी या आंदोलनात मध्यस्थी केली असल्याने संचालक मंडळाने याची पूर्तता करावी असे रायते यांनी स्पष्ट केले.
यानंतर अध्यक्ष प्रशांत काटे, माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी कामगारांची समजूत काढली व त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान येत्या आठव्यात संचालक मंडळाच्या तातडीच्या बैठकीत यावर निर्णय घेऊ असे आश्वासन संचालकांच्या वतीने काटे यांनी दिले.
यावेळी कार्यकारी संचालक गोविंद अनारसे, सचिव अशोक मोरे, माजी कामगार संचालक युवराज रणवरे, सतीश गावडे, दत्तात्रेय निंबाळकर, कामगार कल्याण अधिकारी सपना ढगे आदी यावेळी उपस्थित होते.











