सातारा येथे झालेल्या ‘बीएआय’ राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात बारामती सेंटरची बाजी; साहिल खत्री सर्वोत्कृष्ट अध्यक्ष
बारामती : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (BAI) या राष्ट्रीय पातळीवरील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार २०२५-२६ सोहळ्यात बारामती सेंटरने घवघवीत यश संपादन करत तीन प्रतिष्ठित पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली आहे. सातारा येथे गुरुवारी (दि. २६) पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात बारामती सेंटरचा सन्मान करण्यात आला.
राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत बारामती सेंटरला ‘सर्वोत्कृष्ट सेंटर पुरस्कार’ आणि ‘महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट प्रतिमा संवर्धन उपक्रम पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. तसेच, सेंटरचे विद्यमान अध्यक्ष साहिल खत्री यांना ‘सर्वोत्कृष्ट सेंटर अध्यक्ष पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
‘बीएआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र त्यागी, महाराष्ट्र राज्य चेअरमन प्रकाश मेंढा आणि माजी राज्य चेअरमन जगन्नाथ जाधव यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. बारामती सेंटरच्या वतीने जीसी सदस्य संजय संघवी, सुभाष धिमान, अशपाक सय्यद, सुनील देशमुख आणि जितेंद्र जाधव यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
सांघिक कार्याची राज्यस्तरावर दखल
सन २०२५-२६ या कार्यकाळात अध्यक्ष साहिल खत्री, उपाध्यक्ष सुभाष धिमान, खजिनदार दत्तात्रेय रणवरे, सचिव आदेश वडूजकर आणि सहसचिव जितेंद्र जाधव या कार्यकारिणीने विविध सामाजिक, व्यावसायिक आणि संघटनात्मक उपक्रम प्रभावीपणे राबवले. सभासदांचा सक्रिय सहभाग आणि संस्थेची प्रतिमा उंचावण्यासाठी केलेल्या या सामूहिक प्रयत्नांची राज्यस्तरीय समितीने विशेष दखल घेतली. या यशामुळे बारामतीच्या बांधकाम व्यावसायिक वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, सर्व पदाधिकारी आणि सभासदांच्या एकजुटीमुळेच ही राज्यस्तरीय पावती मिळाल्याची भावना असोसिएशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.










