बारामती : स्वतः आयपीएस (IPS) अधिकारी असल्याची खोटी बतावणी करून आणि सरकारी नोकरीचे आमिष दाखवून दोघा भावांची तब्बल ७ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतयाला बारामती शहर पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. तोसीन इब्राहिम मनियार (रा. सय्यद पाटकर वस्ती, बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
बारामती तालुक्यातील डार्लेवाडी येथील तरुण आरीफ शहाजहान शेख आणि त्यांच्या भावाला आरोपी तोसीन मनियार याने जाळ्यात ओढले होते. “मी आयपीएस अधिकारी असून माझ्या ओळखीने तुम्हाला अन्न व प्रशासन विभागात सरकारी नोकरीला लावतो,” असे आमिष त्याने दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने आरीफ शेख यांच्याकडून सुमारे ७ लाख ८५ हजार रुपये उकळले आणि त्यांना चक्क नोकरीचे खोटे व बनावट प्रमाणपत्र तसेच नियुक्ती पत्र तयार करून दिले. सन २०२२ ते २०२६ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला.
पोलिसांची कारवाई आणि अटक
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरीफ शेख यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१९(२), ३४०(२), ३ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर बारामती शहर पोलिसांनी योग्य नियोजन करून आणि गोपनीय माहितीच्या आधारे २१ नोव्हेंबर २०२६ रोजी त्याला अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या पथकाने केली कामगिरी
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बारामती शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनिषा ओमासे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री देवकाते, पोलीस शिपाई विजय ओमासे आणि प्रविण शिंगाडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.










