दौंड : महान्युज लाईव्ह
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला यवत पोलिसांनी ग्रामस्थ व पोलीस पाटलांच्या मदतीने शिताफीने जेरबंद केले आहे. प्रथमेश दीपक येनपुरे (वय १९, रा. शिवाजी पार्क सोसायटी, फ्लॅट नं. ५०१, अभिनव कॉलेजजवळ, कात्रज, पुणे ४६; मूळ रा. पाबे, ता. वेल्हा, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून गावठी पिस्तूलसाठी वापरले जाणारे एक लोखंडी रिकामे मॅगझीन जप्त करण्यात आले आहे.
काय आहे नेमकी घटना?
मंगळवारी (दि. २५) पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील परिसरात आरोपींनी गोळीबार करत व कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली होती. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपींपैकी काहींना पाटस-दौंड रस्त्यावर गिरीम-बेटवाडी गावच्या हद्दीत पाठलाग करून पकडण्यात पोलिसांना यश आले होते, तर उर्वरित आरोपी फरार झाले होते.
अशी झाली कारवाई
या गुन्ह्यात पाहिजे असलेला फरार आरोपी प्रथमेश येनपुरे हा दौंड तालुक्यातील कडेठाण परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती यवत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ कडेठाण गावात धाव घेतली. स्थानिक पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीने सापळा रचून पोलिसांनी येनपुरे याला शिताफीने ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडे गावठी पिस्तूलचे एक लोखंडी रिकामे मॅगझीन आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या पथकाने केली कामगिरी
ही यशस्वी कारवाई यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र फनसे, पोलीस हवालदार संदीप देवकर, रॉकी देवकाते, प्रतीक जगताप, धीरज जाधव, दिनेश लोणकर आणि विनित कुन्हाडे यांच्या पथकाने पार पाडली.










