पुणे: पुण्यातील बोपदेव घाटात बसची वाट पाहत उभ्या असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या घोळक्यात भरधाव आयशर टेम्पो घुसल्याने मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ट्रिनिटी कॉलेजसमोरील बसथांब्याजवळ हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेत सिद्धेश राजे याचा ससून रुग्णालयात तर विशाल दांगडे याचा रुबी हॉल रुग्णालयात आणि मोहिनी चौधरी या विद्यार्थिनीचा भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर श्वेता तळेकर हिच्यावर रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचार सुरू असून सोहम घंगाळे याच्यावर इनामदार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोन विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर वरील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमका अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालय सुटल्यानंतर ट्रिनिटी कॉलेजचे विद्यार्थी रस्त्याच्या कडेला असलेल्या बसथांब्यावर घरी जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करत उभे होते. त्याच वेळी बोपदेव घाटाच्या तीव्र उतारावरून येणाऱ्या भरधाव आयशर टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेल्या या टेम्पोने आधी पुढे जाणाऱ्या एका कारला मागून जोरदार धडक दिली आणि त्यानंतर थेट बसथांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना चिरडले. अपघात इतका भीषण होता की, काही विद्यार्थ्यांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही. दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
चालक ताब्यात, प्रशासनाचे उपचारांचे निर्देश
घटनेची माहिती मिळताच कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक प्रतीक मारुती चव्हाण याला ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. अपघातातील जखमी विद्यार्थ्यांवर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, मृत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुणे परिसरात मोठी हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.










