बारामती : यवत येथील एका शाळेत शिक्षकी पेशाला काळिमा फासत अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी आरोपी किशोर धनुषा ऊर्फ आप्पाण्णा मधुरे याला दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावास आणि ४५ हजार रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे.
काय होती नेमकी घटना?
या खटल्याची (स्पेशल केस नं. ४२/२०२०) पार्श्वभूमी अत्यंत गंभीर होती. आरोपी किशोर मधुरे हा यवत येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याने शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी जवळीक साधून तिला विश्वासात घेतले. त्यानंतर तिला पालकांच्या कायदेशीर ताब्यातून दूर नेऊन, वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भक्कम पुराव्यांमुळे आरोपीचा गुन्हा सिद्ध
सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील ॲड. ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी एकूण सात साक्षीदार तपासले आणि उपलब्ध पुराव्यांची योग्य सांगड घालत न्यायालयासमोर प्रभावी बाजू मांडली. यामध्ये पीडित मुलीची व तिच्या पालकांची साक्ष, मुलीच्या वयाचा अधिकृत पुरावा, हॉटेलमधील नोंदी, घटनास्थळाचे पंचनामे, जप्त केलेले कपडे, वैद्यकीय कागदपत्रे आणि तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेले सबळ पुरावे महत्त्वाचे ठरले.
न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारा निकाल
“बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कायद्याची कठोर अंमलबजावणी होते आणि अशा गुन्ह्यांना कठोर शिक्षा होऊ शकते, हा महत्त्वाचा संदेश या निकालातून समाजात गेला आहे. हा केवळ एका खटल्याचा निकाल नसून बालकांच्या सुरक्षिततेच्या आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. पीडितेला न्याय मिळणे हेच सरकारी पक्षाचे अंतिम उद्दिष्ट होते,” अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील ॲड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी दिली.
या खटल्यात सरकारी पक्षाला ॲड. योगेश लालबिगे यांनी सहाय्यक म्हणून मदत केली. गुन्ह्याचा सखोल तपास यवत पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ साहेबराव वाघमोडे यांनी केला होता. तसेच यवत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष तासगावकर, पैरवी अधिकारी अभिमन्यू कवडे, कोर्ट कॉन्स्टेबल रियाज मनेरी, पोलीस हवालदार वेणूनाथ ढोपरे आणि सरकारी वकील कार्यालयाच्या लिपिक श्रीमती सुनिता सतीश कांबळे यांनी या खटल्याच्या कामकाजात मोलाचे सहकार्य केले.










