सचिन पवार, महान्यूज लाईव्ह
जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी देऊळगाव रसाळ येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या मागण्या जाणून घेत या प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लक्ष घातल्याची माहिती यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली.
या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष संदीप बांदल, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, बारामती दूध संघाचे चेअरमन किशोर फडतरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पोमणे, प्रमोद खेत्रे, कचेर शिंदे आणि सुनील वाबळे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यासाठी सुनेत्रा वहिनी लवकरच जिल्हाधिकारी आणि संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, सुपे वितरण कुंड ते देऊळगाव रसाळपर्यंत बंदिस्त पाइपलाइन करण्यात यावी, गावातील उर्वरित तलाव व बंधाऱ्यांचा योजनेत समावेश करावा, प्रलंबित भूसंपादनाचा मोबदला मिळावा, बेकायदेशीर सायफनिंगवर कारवाई करावी, तसेच संपूर्ण योजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करावी अशा विविध मागण्या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे आणि सिंचन व्यवस्थेतील प्रलंबित अडचणी दूर व्हाव्यात यासाठी हे आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देत शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले. त्यामुळे या प्रश्नाच्या प्रशासकीय पाठपुराव्याला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आता सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत किंवा पुढाकारातून होणाऱ्या प्रस्तावित बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कोणता तोडगा निघतो आणि प्रत्यक्ष कार्यवाहीला कधी सुरुवात होते याकडे देऊळगाव रसाळसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.










