पाटबंधारे विभागाचे अधिकारी आज घेणार आंदोलकांची भेट; सर्वतोपरी मदतीचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे आश्वासन
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील देऊळगाव रसाळ व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेसंदर्भातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून (दि. २३) देऊळगाव रसाळ ग्रामपंचायतीसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषणकर्त्या ग्रामस्थांशी तसेच पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर संवाद साधला.
शेतकऱ्यांच्या या न्याय्य मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक तोडगा काढावा, अशी विनंती त्यांनी केली. त्यानुसार आज (मंगळवार, दि. २४) पाटबंधारे विभागाचे अधिकारी देऊळगाव रसाळ येथे भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करणार असून, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहे.
जनाई-शिरसाई योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये सुपे वितरण कुंड ते देऊळगाव रसाळपर्यंत संपूर्ण बंदिस्त पाईपलाईन करून तिचा नकाशा ग्रामस्थांना उपलब्ध करून देणे, तसेच गावातील उर्वरित सर्व तलाव व बंधाऱ्यांचा या योजनेत समावेश करणे या मुख्य मागण्यांचा समावेश आहे.
यासोबतच प्रलंबित भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांना त्वरित मोबदला देणे, सुपे वितरण कुंड ते देऊळगाव रसाळ दरम्यान होणाऱ्या बेकायदेशीर सायफनिंगवर कठोर कायदेशीर कारवाई करणे आणि बंदिस्त पाईपलाईनमुळे वाचणारे पाणी परिसरातील वंचित गावांच्या तलावांना शेतीसाठी कायमस्वरूपी देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय ही संपूर्ण योजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करणे, पाईपलाईनचे काम पूर्ण होईपर्यंत कालव्याची गळती रोखून यंत्राद्वारे साफसफाई करणे, गावातील अपूर्ण पोटचाऱ्यांची कामे बंदिस्त पाईपलाईनद्वारे पूर्ण करणे आणि रसाळवाडी येथील तलावाला ‘रसाळवाडी महादेव मंदिर तलाव’ असे नाव देणे, आदी मागण्यांचा यात समावेश आहे.
या मागण्यांच्या पूर्ततेसाठी नागेश शंकर रसाळ, आनंद ज्ञानदेव रसाळ, तानाजी महादेव रसाळ, अमोल बाबूराव वाबळे, राजेंद्र श्रीरंग रसाळ, अनिल काशीनाथ वाबळे, रामदास काशीनाथ थोरात, अश्पाक याकुभभाई इनामदार आणि पांडुरंग मोहन रसाळ हे नऊ शेतकरी बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्या थेट शेतीच्या पाण्याशी व त्यांच्या उपजीविकेशी निगडित असल्याने प्रशासनाने त्यांचा गांभीर्याने विचार करावा तसेच उपोषणकर्त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे खासदार सुळे यांनी प्रशासनाला सुचित केले आहे. या प्रश्नांचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.










