बारामती : पहिली मुलगी झाल्याने दुसऱ्या गर्भधारणेत मुलगाच हवा, या हट्टापायी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या इच्छेविरुद्ध साडेतीन महिन्यांचा गर्भपात घडवून आणल्याचा संतापजनक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात पती, सासू, दीर आणि जाऊ अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित डॉक्टर आणि रुग्णालयाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
फिर्यादी मुस्कान वसीम मुलाणी (वय २७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पहिली मुलगी असल्याने दुसऱ्या खेपेस मुलगाच झाला पाहिजे, असा आग्रह सासरच्या मंडळींकडून धरला जात होता. गर्भातील बाळाचे लिंग जाणून घेण्यासाठी आणि मुलगी असल्यास गर्भपात करण्यासाठी पतीसह सासरच्या नातेवाईकांकडून त्यांच्यावर दबाव आणला जात होता, तसेच मारहाण करून मानसिक छळ व दमदाटी केली जात होती.
याच दबावातून १८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पती आणि दीर यांनी मुस्कान यांना बारामती बसस्थानकाच्या पाठीमागील डॉ. सतीश व्ही. देवकाते यांच्या रुग्णालयात नेले. त्यानंतर १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत सासू, दीर, जाऊ आणि पती यांनी संगनमताने महिलेच्या इच्छेविरुद्ध साडेतीन महिन्यांचा गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.४० वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५३७/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पती वसीम मुबारक मुलाणी, सासू रुक्साना मुबारक मुलाणी, दीर फारुख मुबारक मुलाणी आणि जाऊ सुहाना फारुख मुलाणी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ८९, ८५, ८६, ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप करत आहेत.
दरम्यान, हा गर्भपात नेमक्या कोणत्या वैद्यकीय कारणास्तव करण्यात आला, त्यासाठी संबंधित महिलेची कायदेशीर संमती होती का आणि गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन झाले आहे का, या दृष्टीने संबंधित डॉक्टर व रुग्णालयाच्या कागदपत्रांचीही सखोल चौकशी होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.










