इंदापूर : महान्युज लाईव्ह
कोरोनाने आठ महिन्याच्या काळात खिसा कमी केला, रोजगार कमी केला, पाठीमागच्या काळातील शिलकीला ठेवलेली रक्कम कोरोनाच्या लॉकडाऊन च्या काळात खर्च करावी लागली आणि आता पावसाने अचानक घराला वेढा घालत घरातील होते नव्हते ते सगळे गडप केले..
इंदापूर तालुक्यात पावसाने केलेला हाहाकारानंतर आता उरलेल्या ढिगार्यातून आपलं नेमकं काय गेलं त्याचा शोध ओढ्याकाठी राहणारे लोक घेत आहेत. इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक 190 मिलिमीटर पाऊस ज्या सणसर गावात पडला, त्या ठिकाणी ओढ्याकाठीची फक्त घरेच वाहून नेले नाहीत, तर दहा-पंधरा दिवसावर गाळपाला आलेला उस बुडासकट पावसाच्या पाण्याने ओढून नेला.
या पावसाने दीड वर्षात गाळलेला बळीराजाचा घाम तर नेलाच, पण बळीराजाचे खायचे वांदे देखील करून टाकले. शेकडो एकर शेतीचे नुकसान, शेकडो घरातील कुटुंबाचे आर्थिक नुकसान या पावसाने केले.
यथावकाश या घरातील पंचनामा होईल, नुकसानीचा अंदाज घेतला जाईल, नुकसानाप्रमाणे आर्थिक भरपाई मिळणारच नाही आणि आणि कोरोनाच्या काळात पडलेला खड्डा पावसाने अधिक खोल केला आहे तो भरून कसा काढायचा या विवंचनेत ही कुटुंबे हे पुढचे काही महिने आर्थिक संकटाचा सामना करतील. दोन दिवस त्यांच्याविषयी वाईट वाटेल, मात्र पुढे काय करायचे या विवंचनेने, या चिंतेने पहिल्यांदा आलेले डोळ्यातील अश्रू ही आता थिजून गेले आहेत.येणाऱ्या लोकांना माहिती देण्याचे काम ते करत असले तरी मनावरती झालेला परिणाम अतिशय चिंताजनक आहे त्यातून या बळीराजाला आणि हातावर पोट असलेल्या लोकांना कोण बाहेर काढणार हा खरा प्रश्न आहे.











